मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती आहे. याबाबत पंतप्रधान कार्यालय अथवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.
शिवसेना-भाजपचा काडीमोड झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिली भेट झाली ती पुण्यात. एका कार्यक्रमासाठी पंतप्रधान पुण्यात आले असता प्रोटोकॉल म्हणून मुख्यमंत्री पुणे विमानतळावर पंतप्रधानांच्या स्वागताला गेले होते. ही धावती भेट सोडली तर दोन्ही नेत्यांमध्ये त्यानंतर भेट झालेली नाही. साधारणपणे एखाद्या राज्यात नवं सरकार आल्यानंतर तेथील मुख्यमंत्री पुढच्या काही दिवसांत पंतप्रधानांची भेट घेत असतात व त्यांच्यापुढे राज्याशी निगडीत मुद्दे मांडत असतात. त्याच उद्देशाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीवारीवर जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे पंतप्रधानांची भेट घेतील. शेतकरी कर्जमाफी योजनेसह विविध योजना तसेच प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पांच्या अनुशंगाने निधीची कमतरता भासू नये म्हणून केंद्राने सढळहस्ते मदतीचा हात द्यावा, अशी विनंती या भेटीत मुख्यमंत्री पंतप्रधानांकडे करू शकतात, असे सांगण्यात येत आहे.